उदगीर प्रतिनिधी : परिस्थिती माणसाला घडवते किंवा बिघडवते असे म्हटले जाते . गरिबीत जन्म होणे हा गुन्हा नाही. परंतु गरिबीतच मरणे अपयश असू शकते. अनेकांनी हे सिद्ध केले आहे की कठोर परिश्रम,जिद्द आणि आत्मविश्वासाच्या बळावर शून्यातून विश्व निर्माण करू शकते. याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे गुंडाप्पा बागबंदे आहेत.एका सामान्य अशा बागबंदे कुटुंबात त्यांचा जन्म झाला. दोन वेळच्या जेवणाची भ्रांत आणि शिक्षणाची आबाळ हे त्यांचे सोबती असतात. परिस्थितीशी झुंज देत मॅट्रिक उत्तीर्ण होतात. पुढील शिक्षण परिस्थिती नाजूक असल्याने ते शक्य होत नाही. गरिबीतून श्रीमंत होण्याचा मार्ग हा कष्टाचा असतो. अशा व्यक्ती कधीही परिस्थितीला दोष देत बसत नाहीत. त्याप्रमाणे त्यांनी शिकायच्या वयातच सायकलचे दुकान काढले. मुलांना, लोकांना सायकली किरायाणे देणे, पंक्चर काढणे अशी कामे करायला सुरुवात करतात. जिद्दीने ते आपला व्यवसाय करायला लागतात. मात्र आपले ध्येय यात नाही हे ते निश्चित करतात. त्यांना उदगीरची शैक्षणिक परंपरा माहीत असल्याने शिक्षणाशिवाय किंवा कौशल्याशिवाय आपली गरिबी दूर होणार नाही हे ते मनाशी पक्के ठरवतात. त्यामुळे मिळेल त्या संधीच सोन करतात. लहान सहान कामे करणे, रात्री अभ्यास करणे प्रतिकूल परिस्थितीतही शिकण्याची वृत्ती ठेवणे ही त्यांची वैशिष्ट्ये होत.व्यवसाय करीत कसेबसे ते बारावी उत्तीर्ण होतात. सायकलच दुकान व्यवस्थित चालत असते. एखादी व्यक्ती गरिबीतून बाहेर पडते तेव्हा तिच्याकडे कल्पकता असते. त्याच्याकडे एखादी नवीन कल्पना असते जी त्यांची गरज पूर्ण करते. मेहनत करत आणि आपल्या ग्राहकांना उत्तम सेवा देत त्यातूनच त्यांची विश्वासार्हता वाढते आणि ते आपल आयुष्य जगत असतात. मात्र त्यांची शैक्षणिक ध्येय निश्चितीची किंवा शिक्षणाची ओढ याबाबतचे चिंतन थांबलेले नसते. सध्याच्या या व्यवसायातून फारसे समाधान लाभत नसल्याने त्यांचे कामात मन लागत नाही. त्यातच त्यांना श्री हावगीस्वामी महाविद्यालयात सेवकाची जागा भरणार आहेत हे कानावर पडते. अंगात क्रिएटिव्हिटी म्हणजेच नवनिर्मिती असल्याने, धडपड असल्याने या महाविद्यालयात ते सेवक म्हणून कामाला लागतात. सेवकाचे काम करीत करीत महाविद्यालयात सर्वांच्या प्रति प्रेमाने वागत सर्वांना सेवा देत असतात. सर्वांच्या मुखात गुंडप्पiबद्दल आस्था निर्माण होते.सेवकाचे काम अत्यंत प्रामाणिकपणे ते करीत असतात. मी त्याला साक्षीदार आहे. मी त्यांना सल्ला दिला की तुम्ही लातूर येथे जाऊन ग्रंथालय प्रमाणपत्र (L T C)परीक्षा उत्तीर्ण होऊन उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये ते तुम्हाला पूर्ण करता येईल.तत्कालीन प्राचार्य प्रभूदेव स्वामी सर व प्राचार्य वेळापूरकर सरांचे सहकार्य त्यांना लाभले.ते लातूरला जाऊन ग्रंथालय प्रमाणपत्र परीक्षा चांगल्या मार्काने उत्तीर्ण होतात. त्यामुळे त्यांना ग्रंथालयात काम करण्याची संधी मिळते. लायब्ररी कारकून म्हणून ते कामाला लागतात.माझ्या सोबत माझे सहकारी महादेव हरकरे, गंगाधर बडीहवेली, बेलुरेबाई, साखरे इ.ही कामाला लागतात. ग्रंथालयात ते काम मन लावून करतात. विद्यार्थ्यांना हवे असलेले ग्रंथ उपलब्ध करून देतात.विद्यार्थ्यांना ‘वाचाल तर वाचाल’ म्हणायचे.माझ्याप्रमाणे ‘शोधा म्हणजे ग्रंथ सापडेल’ असे म्हणायचे.ग्रंथ हे उपयोगासाठी आहेत.त्यांचा वापर व्यवस्थित करा. अभ्यास करा मोठे व्हा. याबद्दल सतत विद्यार्थ्यांशी संवाद करून विद्यार्थीप्रिय होतात. इकडे तिकडे न फिरता आपल्या आसनावर बसून विद्यार्थ्यांना सेवा देत राहतात. मार्गदर्शन करतात. समाधानी राहतात.दिवस जात असतात त्यांची सेवा संस्थेला आवडते.त्यामुळे संस्था त्यांना प्रमोशन देते. ते कॅशियर ( खजिनदार ) म्हणून महाविद्यालयात बढतीवर काम करायला सुरुवात करतात.ऑफिसमध्ये काम करत असताना पैशाचा व्यवहार जोखमीने करण्याची जबाबदारी त्यांच्यावर पडते. हिशोब दररोजच्या दररोज जुळवल्याशिवाय ते इतर कर्मचारी गेले असताना सुद्धा स्वतःचे हिशोब जुळवल्याशिवाय उशिरापर्यंत बसून आपलं काम पूर्ण झाल्यावरच घरी जाण्यात त्यांना समाधान वाटते.श्री हiवगीस्वामी महाविद्यालयाच्या ग्रंथालयात काम केल्यामुळे अतिशय दर्जेदार असे शैक्षणिक ग्रंथ त्यांच्या वाचनात येतात. ग्रंथ हाताळताना अनेक व्यक्ती कसे मोठे होतात. शैक्षणिक प्रगती साधतात. याची जाणीव त्यांना सतत होत असल्यामुळे आपणही आपल्या मुलांना शिकवलं पाहिजे,मोठं केलं पाहिजे हे त्यांच्या ध्यानी येते.जिद्दीने मुलाला शिकवतात. मोठे करतात .आज त्यांचा मोठा मुलगा सिद्धेश्वर कम्प्युटर इंजिनियर म्हणून एका मोठ्या कंपनीत कामाला आहे. त्यांची सून देखील इंजिनिअर असून तीही पुण्यात कामाला आहे कंपनीत. त्याचप्रमाणे मुलगी शिवानी हिलाही ते बी. ई. होण्यासाठी आपल्या शहरातील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयातील इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश देतात.ती जिद्दीने शिकते.बी.ई. होते आणि पुण्याला ती सुद्धा इंजिनियर म्हणून कंपनीत कामाला लागते. विशेष म्हणजे तिला चांगल्या कंपनीत नोकरी मिळते. आपल्या भावाच्या नंतर ती कामाला लागते. पण पगार आपल्या भावापेक्षा जास्त तिला मिळतो हे विशेष.तिच्या कर्तृत्वाचं हे यशच आहे.तिच्या जिद्दीच ते फळ आहे असं म्हणायला हरकत नाही. आज शिवानीचे लग्न झालेले आहे तिचा जोडीदारी सॉफ्टवेअर इंजिनियर असून तोही पुण्यात कामाला आहे.अतिशय आनंदाने त्यांची मुलं जीवन जगत आहेत. छोटा मुलगाही एम.सी.ए.पूर्ण करून तोही पुण्यात कामाला लागला आहे. पुण्यात गुंडप्पा यांनी एक फ्लॅट घेतला असून त्या फ्लॅटमध्ये आज मोठा मुलगा सिद्धेश्वर त्याची मिसेस आणि लहान मुलगा शैलेश राहतात. सर्व मुले उच्च शिक्षण घेतल्यामुळे आज मोठ्या पदावर काम करीत आहेत हे गुंडप्पा यांच्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर स्पष्टपणे दिसून येते. मध्यंतरी 2019 च्या कोरोनाच्या काळामध्ये सर्वांच्या प्रमाणे त्यांनाही ट्रीटमेंट म्हणून लसी घ्याव्या लागल्या.त्यामुळे त्या लसींचा त्यांच्या शरीरावर परिणाम झाला. त्यांना आज(G B S) जीबीएस आजाराला तोंड द्यावे लागत आहे.आज ते गेल्या दोन-चार वर्षांपासून अशक्तपणाशी लढा देत आहेत.त्यात त्यांना फार आर्थिक झळ बसत आहे. त्यांनी मुलांना योग्य ते शिक्षण दिल्यामुळेच आज त्यांची मुले उच्च पदावर काम करीत आहेत.आपण पाहतोच की जे वेगळ्या मार्गाने जातात खेडेगावातील महाविद्यालयात प्रवेश घेऊन टक्केवारीसाठी प्रयत्न करतात. ती मुले पुढे यशस्वी होत नाहीत.अभ्यासात मागे पडतात.उत्तीर्ण होत नाहीत. शिक्षण अर्धवट सोडतात. गुंडप्पा त्या मार्गाने जात नाहीत. त्या मार्गाने गेल्या नंतर पुढे त्यांना यश मिळत नाही.आज त्यांच्याच सहवासातल्या काहींची मुलं वडिलोपार्जित कामात किंवा खाजगी नोकर म्हणून किंवा कपड्याच्या दुकानी मुनीम म्हणून काम करताना दिसत आहेत. गुंडप्पा बागबंदे हे एक उत्तम सहकारी म्हणूनही माझा अनुभव आहे. त्यांच्यासारखा सहकारी व मित्र मला लाभला याचा मला सार्थ अभिमान आहे. ते चांगले मित्र आहेत. सज्जन माणूस म्हणून ते जगत असतात.चांगला मित्र लवकर जोडावा. दीर्घ काळ टिकवावा आणि त्याला कधी तोडू नये असेच मला नेहमी वाटत आलेले आहे. कारण जीवनात इतर सर्व काही लाभेल पण चांगल्या मित्राशिवाय आपण जगू शकत नाही हे त्यांच्या सहवासात राहून मला अनुभवायला मिळाल आहे. खरा मित्र लाभणे हेच खरे वरदान होय. मित्र हीच आपली दौलत.चांगला मित्र कधी मन दुखवत नाही. मैत्री ही आश्रय देणाऱ्या एखाद्या वटवृक्षासारखी असते असे मला त्यांच्या वागण्यावरून वाटत आलेले आहे. ते सतत कार्यरत असतात कामात असतात.त्यांची काम सुरू असतात. ती त्यांना स्वस्थ बसून देत नाहीत.म्हणूनच ते उत्साही दिसतात. आज ते 30 वर्षे इतकी सेवा करून सेवानिवृत्त होत आहेत. म्हणूनच त्यांच्याबद्दल मला असे म्हणावे वाटते की, ‘दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती’. त्यांची Creativity नवनिर्मिती लक्षात घेता ते त्यांच्या कामातच यश आहे असे मानतात . महात्मा बसवन्ना म्हणतात त्याप्रमाणे Work is worship and heaven असे ते मानतात. मला इतकेच म्हणावे वाटते की ,त्यांचे कौटुंबिक जीवन सौख्याचे व समाधानाचे आहे. त्यांच्या या यशस्वी वाटचालीत त्यांच्या सहचारिणी सौ. लक्ष्मी यांचीही मोठी साथ त्यांना लाभलेली आहे.आपला माणूस बाहेर सतत काम करीत असतो त्यावेळी आपण घरातल्या सर्व जबाबदाऱ्या व्यवस्थितपणे पार पाडून मुलांच्यावर संस्कार करून त्यांना घडवायचे ही मोठी जबाबदारी त्यांनी अतिशय प्रेमाने सांभाळली आहे. त्यांची साथ गुंडप्पाना चांगल्या प्रकारे लाभल्यामुळेच त्यांनी आपली चांगली प्रगती साधलेली आहे. सर्वच आनंदी आनंद आहे. एकच मंगल कामना…. त्यांना दीर्घायुष्य व चांगले आरोग्य लाभो हीच सदिच्छा. जीवेत शरद: शतम… धन्यवाद. .. प्रा.बाबूराव माशाळकर सेवानिवृत्त ग्रंथपाल
श्री हावगीस्वामी महाविद्यालय, उदगीर.
