शिक्षक साहित्य संमेलनात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 3D किल्ल्यांचे व 5000 दुर्मिळ पोस्ट तिकिटांचे भव्य प्रदर्शन.. प्रेक्षक श्रोत्यांना साहित्याबरोबर इतिहास व भारतीय कला संस्कृतीची मेजवानी….

उदगीर प्रतिनिधीरंगकर्मी साहित्य कला क्रीडा प्रतिष्ठान, उदगीर आयोजित शिक्षक साहित्य संमेलनात इतिहास, साहित्य आणि भारतीय संस्कृतीची अनोखी मेजवानी अनुभवायला मिळणार आहे. दि. १ मार्च रोजी सकाळी ९.३० वाजता उदगीर येथील लिंकन इंटरनॅशनल स्कूल येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा आणि सांस्कृतिक वारशाचा भव्य देखावा साकारला जाणार आहे. यावेळी महाराष्ट्रातील ११ व तामिळनाडूतील १ अशा एकूण १२ गड-किल्ल्यांच्या 3D प्रतिकृतींचे प्रदर्शन होणार असून या किल्ल्यांचा युनेस्कोच्या (UNESCO) जागतिक वारसा यादीत ‘Maratha Military Landscapes’ म्हणून समावेश झालेला आहे. या किल्ल्यांमध्ये रायगड किल्ला, शिवनेरी किल्ला, राजगड किल्ला, सिंधुदुर्ग किल्ला, प्रतापगड किल्ला, लोहगड किल्ला, पन्हाळा किल्ला, साल्हेर किल्ला, सुवर्णदुर्ग किल्ला, विजयदुर्ग किल्ला, खांदेरी किल्ला आणि जिंजी किल्ला यांचा समावेश आहे.या 3D किल्ल्यांच्या प्रतिकृतींसह शूर मावळ्यांचा इतिहास, गनिमी काव्याची रणनिती आणि स्वराज्य स्थापनेचा प्रेरणादायी प्रवास विद्यार्थ्यांना व उपस्थितांना अनुभवता येणार आहे. ही संकल्पना साने गुरुजी शाळेतील सहशिक्षक श्री. संदीप दशरथराव नकाशे यांनी ‘स्वाभिमान मराठी संस्कृती’ या उपक्रमांतर्गत साकारली आहे. पुढील पिढीपर्यंत महाराजांचा इतिहास पोहोचावा हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. कार्यक्रमात सांस्कृतिक वारशाचे आणखी एक आकर्षण म्हणजे ‘सृजन दुर्मिळ पोस्ट तिकिटांचे संग्रह दालन’. सन १९७२ पासून दुर्मिळ पोस्ट तिकिटांचा संग्रह करणारे डॉ. कुलभूषण मोतीलाल कंडारकर व डॉ. माधुरी कंडारकर या दाम्पत्यांचा ५००० हून अधिक तिकिटांचा संग्रह येथे प्रदर्शित केला जाणार आहे. भारतीय कला, संस्कृती, ऐतिहासिक वास्तू, किल्ले, लेण्या, लोककला, पोशाख, वन्यजीव तसेच भारतीय सैन्य दलाच्या महत्वपूर्ण घटनांवरील तिकिटांचा अनमोल ठेवा या प्रदर्शनात पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे भारताच्या स्वातंत्र्यानंतर १९४८ साली प्रसिद्ध झालेले महात्मा गांधी यांचे पहिले टपाल तिकीट तसेच गांधीजींच्या जीवनचरित्रावर आधारित १२० तिकिटांचा विशेष संग्रहही येथे आकर्षण ठरणार आहे. याशिवाय अयोध्या येथील राम मंदिर, विविध सांस्कृतिक वारसे आणि ऐतिहासिक स्मारकांवरील तिकिटांचाही समावेश आहे. या संमेलनातून विद्यार्थ्यांना इतिहास केवळ पुस्तकातून नव्हे, तर प्रत्यक्ष दर्शनातून अनुभवता येणार असून स्वराज्य, स्वाभिमान, संस्कार आणि सांस्कृतिक जाणीवा जागृत करण्याचा हा प्रयत्न असल्याचे आयोजकांनी सांगितले.इतिहास, संस्कृती आणि साहित्य यांचा संगम घडवणारे हे संमेलन उदगीरकरांसाठी एक प्रेरणादायी पर्व ठरणार आहे. सृजन बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे सचिव महादेव खळुरे हे या दोन्ही कलादालनाचे प्रमुख असणार आहेत. सदरील दोन्ही दालनांचा आस्वाद साहित्यिक, कलाकार,इतिहास प्रेमी,शिक्षक बांधव व विद्यार्थी मित्रांनी घ्यावेत असे रंगकर्मी कला क्रीडा प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. बिभीषन मद्देवाड व सचिव प्रा.ज्योती मद्देवाड यांनी आवाहन केले.

maymarathi24news
Author: maymarathi24news

MSW DOCTORATE IN SOCIAL WORK

Leave a Comment

शहर चुनें